अध्यक्षीय मनोगत

समाज बांधवानो, सस्नेह नमस्कार

माझ्या अध्यक्षीय पदाच्या दुसऱ्या कारकीर्दीच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधताना आनंद तर आहेच, पण त्याहीपेक्षा जबाबदारीची जाणीव अधिक तीव्र झाल्याची भावना आहे. मागील ३ वर्षात जे काही थोडेफार कार्य माझे सहकारी, पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांचे संयुक्त सहकार्याने करू शकलो, त्यात सातत्य ठेवणे मोठे जिकरीचे आहे ! मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी, पदाधिकारी, समिती प्रमुख व कार्यकारिणी सदस्य मला ह्यापुढेही तसेच सहकार्य करीत राहतील.

माझे वडील प.पू. सदानंद साखरे ज्यांना आम्ही पप्पा संबोधित असू, त्यांच्या समाजकार्याचा वसा व कार्य मी जवळून पाहिले आहे... कदाचित त्यांचा प्रभाव... त्यांची प्रेरणा हीच माझ्या ह्या समाजकार्याची उर्जा आहे ! मालाड शाखा व श्री विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्ट ह्या दोन संस्थेत कार्यरत असताना तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने व विभागीय समाजबांधवांच्या प्रेरणेने मध्यवर्ती मंडळात कार्यरत झालो... तसेच मागील ४ वर्षापासून अखिल समाजाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. हे मी माझे भाग्यच समजतो. अनंत अडचणींना सामोरे जात आपला कॉलेज प्रकल्प आज सुस्थितीत येण्याच्या मार्गावर आहे... समाजप्रेमी दानशूर ज्ञाती-बांधवांनी सढळ हस्ते देणग्या दिल्यामुळे कॉलेज इमारतीचे दुसऱ्या मजल्याचे बांधकाम आम्ही पूर्णत्वास नेऊ शकलो.. ऑडीटोरीयम, लायब्ररी व सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा इ. सुविधा निर्माण करता आल्या.. त्यामुळे विद्यार्थी संख्येत वाढ झाली. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात त्यात निश्चित वाढ होऊन कॉलेजचा “ताळेबंद” अधिक व्यापक होईल ह्याची शाश्वती आली. संयोग मंदिर, ठाणे प्रकल्प देखील आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने व सहकार्याने कार्यान्वित झाला असून मान्यवरांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा देखील संपन्न झाला आहे. केळवे भागधारकांच्या व एकंदरीत समाजाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला केळवे जमीन विक्री व्यवहार पूर्णत्वास नेण्याचे आमचे प्रयत्न सुरु असून त्यात प्रभू विश्वकर्मा आपल्या सर्वांना निश्चित यश देईल, ही आशा !

आपले मोलाचे सहकार्य मिळत राहो, हीच अपेक्षा.

आपला स्नेहांकित,

श्रो. सुनिल साखरे

अध्यक्ष, श्री पांचाळ समाज मध्यवर्ती मंडळ, मुंबई

Copyright © 2021 and all Rights Reserved by PANCHAL SAMAJ and Developed by DELTASOFT